दि:३एप्रिल २१: मुंबई/पुणे, वाढत्या कोरोना रुग्ण संख्या मुळे असंघटित कामगार पुन्हा आपल्या मूळ गावी परत जाण्याच्या विचारात असल्याबाबत अनेक संघटना मार्फ़त समजते आहे.
२०१९ च्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील आलेल्या महापुरावेळी तसेच अनेक आपत्तीत सरकार व सामाजिक संस्था एकत्र येऊन त्यांनी मजुर,गरजु लोकांसाठी मोफत अन्न छत्र सुरू केले होते. यामध्ये दररोज जवळपास सरासरी २५००० लोकांना जेवण मिळाले. अशाप्रकारे जर शासनाने स्वयंसेवी संस्थांना व मोठ्या उद्योजकांना मोफत अन्न छत्र सुरू करणेस सूचित केले तर नक्की अनेक स्थलांतरित होण्याच्या मानसिकतेतील व स्थायिक गरीब लोकांना याचा दिलासा मिळेल.
रेशन कार्ड वर सध्या वाटत होणारे प्रत्येक कुटुंबास ३५ किलो धान्य हे तात्काळ उचलायला सांगणे व गत वर्षी प्रमाणे मोफत धान्य ही वाटप करणे आवश्यक आहे. पुणे जिल्हापरिषद यांनी राबविलेली रेशन कार्ड नसणाऱ्या कुटुंबासाठीची धान्य योजना सर्व राज्यात राबविण्यासाठी शासनस्तरावरून सूचना देणेत याव्यात. यामुळे गरीब,मजूर व असंघटित कामगारांना नक्कीच मदत मिळेल.
तसेच अनेक स्थलांतरित कुटुंबे ही कामाच्या ठिकाणी घर भाड्याने घेऊन राहतात. वाढत्या कोरोना रुग्णामुळे शासनाने आणलेले अंशत:निर्बंध हे कष्टकरी मजुरांचा रोजगाराच्या संधी कमी करणारी आहे. त्यामुळे त्यांना घरभाडे भरणे शक्य होणार नाही. नैसर्गिक आपत्तीमध्ये शासन सानुग्रह अनुदान प्रत्येक व्यक्तीस रु.१०००/- व कुटुंबास रु५०००/- मर्यादेत देत असते. ही पण नैसर्गिक आपत्तीच असल्याने अशा असंघटित कामगारांना प्रत्येक व्यक्तीस रु १०००/- कुटुंबास रु.५०००/- मर्यादेत शासनाने त्यांचे बँक खात्यात द्यावयास हवेत असे वाटते.
वरील दोन्ही उपाय योजना ह्या गरीब,मजूर व असंघटित कामगारांना नक्कीच दिलासा देतील. त्यांचे स्वास्थ्य चांगले ठेवण्यास व या आपत्तीत तारून जाण्यास नक्कीच मदत करतील असे दिसते. असे लेखी पत्र डॉ नीलम गोऱ्हे उपसभापती विधान परिषद यांनी मा .ना.श्री उद्धवजी ठाकरे ,मुख्यमंत्री याना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार,महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, अन्न पुरवठा मंत्री ना.छगनदादा भुजबळ, रोहयो मंत्री ना.संदीपान भुमरे, पुर्नवसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार, तसेच कामगार मंत्री ना. दिलीप वळसे-पाटील या विषयी सबधित मंत्री यांना पत्र देण्यात आले.
या उपाय योजना ह्या गरीब व असंघटित कामगारांना नक्कीच दिलासा देतील व त्यांचे कोरोना कालावधीतील त्रास कमी होईल असा विश्वास ना.नीलम गोर्हेनी व्यक्त केला आहे.