*ना विधानसभा, ना परिषद, काँग्रेस सोडण्याचा इशारा दिलेल्या माजी मंत्र्याला कार्यकारी अध्यक्षपद*

Share This News

काँग्रेसकडून आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप चंद्रकांत हंडोरेंनी काही दिवसांपूर्वी केला होता.

मुंबई : काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा सस्पेन्स अखेर संपला. विधानसभा अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतर नाना पटोले (Nana Patole) यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली. तर त्यांच्या दिमतीला 6 कार्याध्यक्षही देण्यात आले आहेत. याशिवाय दहा उपाध्यक्षांची फौजही आहे. भीमशक्ती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांच्या गळ्यातही कार्याध्यक्षपदाची माळ घालण्यात आली आहे. विधानसभेला पराभव आणि विधानपरिषदेचं तिकीट न मिळाल्याने हंडोरे पक्षावर नाराज होते. त्यामुळे हंडोरेंचं संभाव्य पक्षांतर रोखण्यास काँग्रेसला यश आल्याचं चित्र आहे. (Congress Former Minister Chandrakant Handore is new Executive President)

*कोण आहेत चंद्रकांत हंडोरे?*

चंद्रकांत हंडोरे हे मुंबईतील चेंबूरचे माजी आमदार आहेत. त्यांनी सामाजिक न्यायमंत्री म्हणून आघाडी सरकारच्या काळात काम पाहिले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहेत.
काँग्रेसकडून आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप चंद्रकांत हंडोरेंनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे हंडोरे काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता बळावली होती.

*स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा*
नाशिकमध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ‘भीमशक्ती’च्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. कार्यकर्त्यांकडून काँग्रेस सोडण्यावर भर दिला जात होता. आगामी काळात भीमशक्ती संघटना राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचंही चंद्रकांत हंडोरे यांनी स्पष्ट केलं होतं. भीमशक्ती संघटनेचं पक्षात रुपांतर करण्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात होतं.
*विधानसभेला पराभव, विधानपरिषदेचं तिकीटही नाही*

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकीटावर रिंगणात उतरले होते, मात्र शिवेसेनेच्या प्रकाश फातर्पेकर यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का स्वीकारावा लागला. त्यातच विधानपरिषदेवरही वर्णी न लागल्याने हंडोरे नाराज असल्याची माहिती होती.

*कार्य अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल पुणे मध्ये एकच जल्लोष*

5 फेब्रुवारी कार्य अध्यक्ष पदी चद्रंकात हंडोरे यांची निवड झाल्यानंतर पुणे मध्ये एकच जल्लोष पहायला मिळाला. पुणे येरवडा ही नवनिर्वाचीत अध्यक्षचा बालेकिल्ला असून अजय जानराव. गणेश विटकर हे त्यांचे निकटवर्तीय आहेत. कॉग्रेस कार्यकर्त्यांनी गुलाल आणि फटाक्याची आतषबाजी केली आणि पेढे वाटून आनंदही व्यक्त केला. चद्रंकात हंडोरे यांची कार्य अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. त्यांचे समर्थक आणि निकटवर्तीयांनी पुणे स्टेशन येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाला जावून अभिवादन केले व जल्लोष साजरा केला व त्यांच्या कारकिर्दीला यश लाभो अशी प्रार्थना केली.

काँग्रेसची नवी टीम
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले
कार्यकारी अध्यक्ष
1. शिवाजी मोघे (यवतमाळ)
2. बस्वराज पाटील (उस्मानाबाद)
3. नसीम खान (मुंबई)
4. कुणाल पाटील (धुळे)
5. चंद्रकांत हंडोरे (मुंबई)
6. प्रणिती शिंदे (सोलापूर)
(Congress Former Minister Chandrakant Handore is new Executive President)
प्रदेश उपाध्यक्ष
1. शिरीष चौधरी (जळगाव)
2. रमेश बागवे (पुणे)
3. हुसैन दलवाई (मुंबई)
4. मोहन जोशी (पुणे)
5. रणजीत कांबळे (वर्धा)
6. कैलाश गोरंट्याल (औरंगाबाद)
7. बी. आय. नगराळे
8. शरद अहेर (नाशिक)
9. एम. एम. शेख (औरंगाबाद)
10. माणिकराव जगताप (रायगड)